श्री देवी अथर्वशीर्ष मराठी भावार्थ

श्री देवी अथर्वशीर्ष – मराठी भावार्थ

 

देवी अथर्वशीर्ष हे देवीचे परम स्वरूप उलगडून सांगणारे अथर्ववेदाशी संबंधित शाक्त उपनिषद आहे. याला देवी उपनिषद किंवा देव्युपनिषद असेही म्हणतात. या उपनिषदामध्ये देवी केवळ एका विशिष्ट रूपापुरती मर्यादित नसून तीच ब्रह्मस्वरूपिणी आणि संपूर्ण विश्वाची आदिशक्ती आहे, असा व्यापक भाव मांडला आहे. प्रकृती आणि पुरुष, ज्ञान आणि अज्ञान, दृश्य आणि अदृश्य, साकार आणि निराकार अशा परस्परविरोधी वाटणाऱ्या सर्व तत्त्वांचे मूळ देवीच आहे. किंबहुना, संपूर्ण विश्व तिच्यापासून प्रकट झाले असून तीच या विश्वाला धारण करणारी आणि त्याच्या कणाकणांत व्यापून राहिलेली आहे.

॥ श्रीगणेशाय नमः॥
॥ शान्तिमन्त्राः॥
ॐ भद्रं कर्णेभिः श‍ृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

हे देवा! भगवंताचे पूजन करताना आपण कल्याणकारक मंगलमय शब्द आपल्या कानाने ऐकावे, शुभ मंगलदायी गोष्टी आपल्या डोळ्यांनी पहाव्यात. निरोगी अवयवांसाहित, स्वस्थ देहाने, भगवंताचे स्तवन करत, देवाने आमच्या हितार्थ दिलेले दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, हीच प्रार्थना आहे.
ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऐकिवांत आहे, असा इंद्र आमचें कल्याण करो. सर्वज्ञ व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. सर्व आरीष्टांचा नाश करण्यासाठी ज्याची शक्ती चक्र सदृश आहे, असा तार्क्ष्य (गरूड) – अरिष्टनेमी आमचे कल्याण करो. बुद्धीचा स्वामी, बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो.
आमच्या (आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा) त्रिविध कष्टांची त्रासांची शांती होऊ दे.

 

॥ अथ अथर्वशीर्षारम्भः॥
ॐ सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः कासि त्वं महादेवीति ॥ १ ॥

सर्व देव आदराने महादेवीजवळ गेले आणि म्हणाले, “हे महादेवी, आपण नेमक्या कोण आहात? आपले खरे स्वरूप काय आहे?” (हा प्रश्न रूपाविषयी नसून देवीच्या परम तत्त्वाविषयी आहे.)

१. देवीमुपतस्थुः – देवीम् + उपतस्थुः – देवीजवळ जाऊन उपस्थित झाले, शरण गेले.
२. कासि त्वम् – का + असि + त्वम् – आपण कोण आहात?

 

साऽब्रवीत् – अहं ब्रह्मस्वरूपिणी ।
मत्तः प्रकृतिपुरुषात्मकं जगत् । शून्यं चाशून्यं च ॥ २ ॥
अहमानन्दानानन्दौ । अहं विज्ञानाविज्ञाने । अहं ब्रह्माब्रह्मणी वेदितव्ये ।
अहं पञ्चभूतान्यपञ्चभूतानि । अहमखिलं जगत् ॥ ३ ॥
वेदोऽहमवेदोऽहम् । विद्याऽहमविद्याऽहम् ।
अजाऽहमनजाऽहम् । अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चाहम् ॥ ४ ॥

देवी म्हणाली – “मी ब्रह्मस्वरूपिणी आहे. चेतन पुरुष आणि सृजनशील प्रकृती यांपासून बनलेले हे संपूर्ण जग माझ्यापासूनच प्रकट झाले आहे. जे शून्य, निराकार व अदृश्य आहे आणि जे अशून्य, साकार व दृश्य आहे, ते सर्व मीच आहे.”
“आनंद आणि आनंदाचा अभाव, ज्ञान आणि अज्ञान, जाणण्याजोगे ब्रह्म आणि ब्रह्माहून भिन्न भासणारे जग, पंचमहाभूते आणि त्यांच्या पलीकडील सूक्ष्म तत्त्वे – हे सर्व माझेच रूप आहे. किंबहुना हे अखिल विश्व मीच आहे.” (देवी येथे विरोधी भासणाऱ्या प्रत्येक अवस्थेचे मूळ एकच आहे, हे सांगते.)
“मी वेद आहे आणि वेदांच्या पलीकडील ज्ञानही मीच आहे. मी विद्या आहे आणि अविद्याही माझ्याच शक्तीतून दिसते. मी अजन्मा आहे, तसेच जन्म घेणाऱ्या प्रत्येक रूपातही मीच प्रकटते. खाली, वर आणि सर्व दिशांना मीच व्यापून आहे.”

१. प्रकृतिपुरुषात्मकम् – प्रकृति + पुरुष + आत्मकम् – प्रकृती व पुरुष या दोन्ही तत्त्वांनी युक्त.
२. चाशून्यम् – च + अशून्यम् – आणि जे शून्य नाही, म्हणजे दृश्य-साकार.
३. आनन्दानानन्दौ – आनन्द + अनानन्दौ – आनंद आणि अनानंद.
४. विज्ञानाविज्ञाने – विज्ञान + अविज्ञाने – ज्ञान आणि अज्ञान.
५. ब्रह्माब्रह्मणी – ब्रह्म + अब्रह्मणी – ब्रह्म (परम, अविनाशी, सर्वव्यापी सत्य) + अब्रह्म (जे ब्रह्माहून वेगळे भासते असे जग)
६. पञ्चभूतान्यपञ्चभूतानि – पञ्चभूतानि (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते) + अपञ्चभूतानि (जी पंचमहाभूते नाहीत किंवा पंचमहाभूतांच्या पलीकडील सूक्ष्म तत्त्वे)
७. वेदोऽहमवेदोऽहम् – वेदः + अहम् + अवेदः + अहम् – अवेदः (वेदांपलीकडील ज्ञान)
८. विद्याऽहमविद्याऽहम् – विद्या + अहम् + अविद्या + अहम् – अविद्या (अज्ञान)
९. अजाऽहमनजाऽहम् – अजा + अहम् + अनजा + अहम् – अजा (जिला जन्म नाही अशी, अजन्मा), अनजा (अजन्मा नसलेली, जन्म घेऊन प्रकट झालेली)

 

अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि । अहमादित्यैरुत विश्वदेवैः ।
अहं मित्रावरुणावुभौ बिभर्मि । अहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥ ५ ॥
अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि ।
अहं विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥ ६ ॥
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ।
अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् ।
अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।
य एवं वेद । स दैवीं सम्पदमाप्नोति ॥ ७ ॥

“मी रुद्र, वसू, आदित्य आणि विश्वेदेव यांच्या शक्तिरूपाने कार्य करते. मित्र व वरुण या दोघांना मीच धारण करते. इंद्र आणि अग्नी तसेच दोन्ही अश्विनीकुमार यांचे सामर्थ्यही माझ्यापासूनच आहे.” (सर्व देवतांमध्ये कार्य करणारी मूळ चेतनशक्ती देवीच आहे.)
“सोम, त्वष्टा, पूषा आणि भग यांना मीच धारण करते. विशाल पावलांनी विश्व व्यापणारा विष्णू, ब्रह्मदेव आणि प्रजापती यांचे अस्तित्व व कार्यशक्तीही मीच सांभाळते.”
“श्रद्धेने हविष्य अर्पण करणाऱ्या यजमानाला मी संपत्ती व समर्थता देते. मी विश्वाची अधीश्वरी, सर्व संपत्ती एकत्र आणणारी, सर्व जाणणारी आणि यज्ञात प्रथम मानाची आहे. मी या विश्वाचा पिता असलेल्या द्युलोकाला (आकाशाला) माझ्या स्वतःच्या शिखरावर (मस्तकावर) निर्माण करते. माझे मूळ उत्पत्तीचे स्थान (कारण रूप) हे पाण्याच्या आत, म्हणजेच चैतन्याच्या अथांग सागरामध्ये आहे. जो हे तत्त्व जाणतो, त्याला दैवी गुणांची संपदा प्राप्त होते.”

१. रुद्रेभिर्वसुभिः – रुद्र आणि वसू यांच्यासह.
२. बिभर्मि – मी धारण करते, पोषण करते.
३. अश्विनावुभौ – अश्विनौ + उभौ – दोन्ही अश्विनीकुमार.
४. सोमं – सोमदेवाला (औषधी आणि आनंदाचा देव / चंद्रदेव)
५. त्वष्टारं – त्वष्टा देवाला (विश्वाचा निर्माता/शिल्पी किंवा विश्वकर्मा देवतत्त्व)
६. पूषणं – पूषा देवाला (पोषण करणारे, मार्गदर्शन करणारे सूर्यतत्त्व)
७. भगं – भग देवाला (सौभाग्य आणि समृद्धीचे देवतत्व)
८. विष्णुमुरुक्रमम् – विष्णुम् + उरुक्रमम् – व्यापक पावलांनी विश्व व्यापणारा विष्णू.
९. द्रविणम् – धन, साधनसंपत्ती, कार्यसामर्थ्य.
१०. हविष्मते – हविष्य अर्पण करणाऱ्यास.
११. राष्ट्री – संपूर्ण विश्वव्यवस्थेची अधीश्वरी.
१२. सङ्गमनी वसूनाम् – संपत्ती व शक्ती एकत्र आणणारी.
१३. चिकितुषी – सर्व जाणणारी, ज्ञानस्वरूप.
१४. सुवे- जन्म देते / निर्माण करते.
१५. मूर्धन् – (माझ्या स्वतःच्या) मस्तकावर / शिखरावर.
१६. अप्स्वन्त – अप्सु + अन्तः – पाण्याच्या आत / पंचमहाभूतांच्या कारणांमध्ये
१७. दैवीं सम्पदम् – निर्भयता, शुद्धता, करुणा, विवेक इत्यादी दैवी गुण.

 

ते देवा अब्रुवन् – नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥ ८ ॥
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् ।
दुर्गां देवीं शरणं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्र्यै ते नमः ॥ ९ ॥

तेव्हा देव म्हणाले, “त्या देवीला, महादेवीला आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या शिवेला आमचा निरंतर नमस्कार असो. जगाचे मूळ असलेल्या प्रकृतीला, मंगलमय भद्रेला आम्ही संयमाने व पूर्ण नम्रतेने प्रणाम करतो.”
“तपश्चर्येच्या तेजाने अग्नीसारखी प्रकाशमान, विश्वाला प्रकाशित करणारी आणि प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फल देणारी ती दुर्गादेवी आम्हाला शरण असो. अंतर्बाह्य आसुरी वृत्तींचा नाश करणाऱ्या देवी, तुला नमस्कार असो.”

 

देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति ।
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुतैतु ॥ १० ॥
कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम् ।
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥ ११ ॥

देवतांनी वाणीच्या रूपाने देवीला प्रकट केले. विविध रूपे धारण करणारे सर्व प्राणी तिच्याच वाणीने बोलतात. कामधेनूप्रमाणे मधुर, पोषक आणि सामर्थ्यदायी ज्ञान देणारी ती दिव्य वाणी आमच्याजवळ येवो आणि आमच्या वचनांना सद्भाव व सत्याचे बळ देवो.
प्रलयकाळातील कालरात्री, ब्रह्मदेवाने स्तवन केलेली, विष्णुशक्तिरूप वैष्णवी, स्कंदमाता, ज्ञानस्वरूप सरस्वती, देवमाता अदिती आणि दक्षकन्या अशा अनेक रूपांत प्रकटणाऱ्या पवित्र व कल्याणमयी देवीला आम्ही नमस्कार करतो.

१. वाचमजनयन्त – वाचम् + अजनयन्त – वाणी प्रकट केली.
२. मन्द्रेषम् – आनंददायी, मधुर आणि हितकारक.
३. ऊर्जम् – सामर्थ्य, पोषण.
४. धेनुः – गाय; येथे इच्छित ज्ञान व पोषण देणारी वाणी.
५. सुष्टुतैतु – सुष्टुता + एतु – उत्तम स्तुतीसह आमच्याकडे येवो.
६. ब्रह्मस्तुताम् – ब्रह्मदेवाने स्तवन केलेली.
७. वैष्णवीम् – विष्णूची शक्ती किंवा विष्णुस्वरूपिणी.
८. अदितिम् – अखंड, बंधनरहित देवमाता.
९. दक्षदुहितरम् – दक्ष + दुहितरम् – दक्ष प्रजापतीची कन्या.

 

महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ॥ १२ ॥

(हा मंत्र महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून ओळखला जातो.) आम्ही महालक्ष्मीला जाणतो (तिचे ध्यान करतो) आणि सर्व शक्तींचे मूळ असलेल्या त्या सर्वशक्तीची उपासना करतो. ती प्रकाशमान देवी महालक्ष्मी आम्हा सर्वांना (सद्बुद्धीची आणि प्रगतीची) प्रेरणा देवो.
१. विद्महे – आम्ही जाणतो, जाणण्याचा प्रयत्न करतो.
२. धीमहि – आम्ही ध्यान करतो.
३. प्रचोदयात् – प्रेरणा देवो, सद्बुद्धी जागृत करो.

 

अदितिर्ह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव ।
तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥ १३ ॥

हे दक्षराजा! तुझी कन्या म्हणून अदिती प्रकट झाली, परंतु तीच सर्व देवतांची आदिमाता ठरली. तिच्यापासून कल्याणकारी आणि अमृततत्त्वाशी नाते असलेल्या देवशक्ती प्रकट झाल्या. बाह्य नात्यांनी ती कन्या भासली, तरी तत्त्वतः ती सर्वांची जननी आहे.

१. अदितिर्ह्यजनिष्ट – अदितिः + हि + अजनिष्ट – अदिती प्रकट झाली.
२. अन्वजायन्त – नंतर जन्मले, प्रकट झाले.
३. अमृतबन्धवः – अमृततत्त्वाशी संबंधित, अमर देवगण.

 

कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः ।
पुनर्गुहा सकला मायया च पुरूच्यैषा विश्वमातादिविद्योम् ॥ १४ ॥
एषाऽऽत्मशक्तिः । एषा विश्वमोहिनी । पाशाङ्कुशधनुर्बाणधरा ।
एषा श्रीमहाविद्या । य एवं वेद स शोकं तरति ॥ १५ ॥
नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान् पाहि सर्वतः ॥ १६ ॥

या गूढ मंत्रात देवीच्या बीजमंत्रातील अक्षरे विविध देवतत्त्वे व शक्तींच्या संकेतांनी सांगितली आहेत. वज्रधारी इंद्राचे सामर्थ्य, हृदयगुहेतील गुप्त चैतन्य, प्राणरूप वायू, जलधारण करणारा मेघ आणि दैवी ऐश्वर्याचा अधिपती इंद्र हे सर्व देवीचेच आविष्कार आहेत. ती पुन्हा गुप्त बीजरूपाने, सर्व अक्षरांना सामावून घेणाऱ्या सकल शक्तीच्या रूपाने आणि मायाशक्तीच्या रूपाने प्रकटते. अनेक रूपांनी सर्वत्र व्यापून असलेली तीच संपूर्ण विश्वाची माता, सर्व विद्यांची आदिविद्या आणि प्रणवरूप परब्रह्म आहे.
ही देवी प्रत्येक जीवातील आत्मशक्ती आहे. तीच विश्वमोहिनी माया आहे. पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण करून ती आसक्तीला बांधते, चंचल वृत्तीला आवरते आणि ध्येयाकडे नेते. तीच श्रीमहाविद्या आहे. जो तिचे हे स्वरूप जाणतो, तो शोकसागराच्याच्या पलीकडे जातो.
हे ऐश्वर्यशालिनी भगवती, हे जगन्माते, तुला नमस्कार असो. बाह्य संकटांपासूनच नव्हे, तर अज्ञान, अहंकार, भीती आणि चुकीच्या प्रवृत्तींपासूनही सर्व बाजूंनी आमचे रक्षण कर.

१. वज्रपाणिर्गुहा – वज्रपाणिः + गुहा – वज्र धारण करणारा इंद्र आणि गुप्त तत्त्वरूप गुहा
२. मातरिश्वा – अंतरिक्षात संचार करणारा वायू; सर्व जीवांतील प्राणशक्ती.
३. पुरूच्यैषा – पुरूची + एषा – अनेक रूपांनी प्रकटणारी आणि सर्वत्र व्यापून असलेली ही देवी.
४. विश्वमातादिविद्योम् – विश्वमाता + आदिविद्या + ॐ – विश्वाची जननी, सर्व विद्यांची मूलशक्ती आणि प्रणवरूप ब्रह्म असलेली देवी.
५. एषाऽऽत्मशक्तिः – एषा + आत्मशक्तिः – हीच अंतर्यामी आत्मशक्ती.
६. विश्वमोहिनी – विश्वाला मोहात पाडणारी महामाया.
७. पाशाङ्कुशधनुर्बाणधरा – पाश + अङ्कुश + धनुः + बाण + धरा.
८. शोकं तरति – शोकसागर पार करतो.
९. मातरस्मान् – मातः + अस्मान् – हे माते, आम्हाला.
१०. पाहि सर्वतः – सर्व बाजूंनी रक्षण कर.

 

सैषाष्टौ वसवः । सैषैकादश रुद्राः । सैषा द्वादशादित्याः ।
सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च ।
सैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षाः सिद्धाः ।
सैषा सत्त्वरजस्तमांसि । सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणी ।
सैषा प्रजापतीन्द्रमनवः । सैषा ग्रहनक्षत्रज्योतींसि ।
कलाकाष्ठादिकालरूपिणी । तामहं प्रणौमि नित्यम् ।
पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् ।
अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम् ॥ १७ ॥

आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, विश्वेदेव, सोमपान करणाऱ्या व न करणाऱ्या देवशक्ती, तसेच यक्ष, सिद्ध, असुर, राक्षस व पिशाच यांच्यामध्येही कार्य करणारी मूलशक्ती तीच आहे. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण; ब्रह्मा, विष्णू, रुद्र; प्रजापती, इंद्र, मनू; ग्रह, नक्षत्रे, प्रकाशमान विश्व आणि क्षणापासून कल्पापर्यंतचा काळ – हे सर्व तिच्याच अधीन आहे. पाप दूर करणाऱ्या, भोग व मोक्ष देणाऱ्या, अनंत, विजयी, शुद्ध, शरणागतांचे रक्षण करणाऱ्या आणि कल्याण देणाऱ्या त्या देवीला मी नित्य प्रणाम करतो.

१. सैषा – सा + एषा – तीच ही.
२. सैषाष्टौ वसवः – आठ वसू – धरा (पृथ्वी), ध्रुव (ध्रुवतारा किंवा नक्षत्रतत्त्व), सोम (चंद्र), आप (जल) अथवा अह (दिवस), अनिल (वायू), अनल (अग्नी) , प्रत्यूष (सूर्योदय किंवा प्रभात) आणि प्रभास (प्रकाशमान आकाश किंवा द्युलोक) हे आठ वसू. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, चंद्र, तारे, प्रभात आणि प्रकाश यांसारख्या विश्वातील मूलभूत शक्तींचे ते प्रतिनिधित्व करतात. देवीच या सर्व नैसर्गिक व वैश्विक शक्तींच्या रूपाने कार्य करते.
३. सैषैकादश रुद्राः – अकरा रुद्र – मृगव्याध (चंचल मनरूपी मृगावर नियंत्रण ठेवणारा), सर्प (सर्परूप अथवा कुंडलाकार शक्ती), निऋति (क्षय व विनाश नियंत्रित करणारी शक्ती), अजैकपाद (अजन्मा व एका आधारावर स्थित असलेले तत्त्व), अहिर्बुध्न्य (विश्वाच्या गूढ मूलाधाराशी संबंधित नागरूप शक्ती), पिनाकी (पिनाक धनुष्य धारण करणारा), दहन (अग्निरूपाने अशुद्धता नष्ट करणारा), ईश्वर (विश्वाचा स्वामी व नियंता), कपाली (कपाल/डोक्याची कवटी धारण करणारा), स्थाणु (स्थिर, अचल व अविनाशी तत्त्व) आणि भव (सृष्टीच्या उत्पत्तीचे व अस्तित्वाचे मूळ) हे अकरा रुद्र. संहार, परिवर्तन, शुद्धीकरण, नियंत्रण, स्थैर्य आणि पुनर्निर्मिती यांसारख्या विश्वातील विविध वैश्विक शक्तींचे ते प्रतिनिधित्व करतात. देवीच या सर्व रुद्ररूपांना धारण करणारी आणि त्यांच्या माध्यमातून विश्वातील परिवर्तन, संहार व पुनर्निर्मितीची कार्ये घडवून आणणारी मूलशक्ती आहे.
४. सैषा द्वादशादित्याः – बारा आदित्य – धाता (नवनिर्मिती व निर्मितीचा आधार), अर्यमा (कर्तव्य, समाज आणि पूर्वजांचे तत्त्व), मित्र (मैत्री, प्रेम आणि वैश्विक संतुलन), वरुण (नैतिक नियम आणि जलतत्त्व), अंश (न्याय्य वाटा आणि समृद्धी), भग (भाग्य, ऐश्वर्य आणि तेज), विवस्वान (प्रखर तेज आणि विवेक), पूषा (पोषण, प्रगती आणि मार्गदर्शक), सविता (प्रेरणा आणि ज्ञानप्रदाता), त्वष्टा (शिल्पकार आणि कलात्मक रूप-रंग), विष्णू (सृष्टीचे पालन आणि व्यापकता) आणि शक्र (नेतृत्व आणि दैवी सामर्थ्य) हे बारा आदित्य. सृष्टीचे सातत्य, काळाचे चक्र (१२ महिने), प्रकाश, उष्णता, जल, पाऊस, अन्न, पोषण, सृजन, पालन, आणि विश्वव्यवस्था यांसारख्या विश्वातील विविध वैश्विक क्रियांचे ते प्रतिनिधित्व करतात. देवीच या सर्व आदित्यरूपांना धारण करणारी आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला प्रकाश, ऊर्जा, पोषण व जीवन प्रदान करणारी मूलशक्ती आहे.
५. सत्त्वरजस्तमांसि – सत्त्व + रजस् + तमांसि – तीन गुण.
६. प्रजापतीन्द्रमनवः – प्रजापति + इंद्र + मनू
७. कलाकाष्ठादिकालरूपिणी – कला, काष्ठा इत्यादी काळाच्या सर्व विभागांचे रूप असलेली.
८. भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् – भुक्ति + मुक्ति + प्रदायिनीम् – ऐहिक सुख व मोक्ष देणारी.
९. शिवदाम् – कल्याण देणारी.

 

वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् ।
अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधनम् ॥ १८ ॥
एवमेकाक्षरं ब्रह्म यतयः शुद्धचेतसः ।
ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ॥ १९ ॥

आकाशाचा संकेत, ईकार आणि अग्नितत्त्व यांचा संयोग करून, अर्धचंद्र व बिंदूने शोभणारे देवीचे एकाक्षरी बीज तयार होते. हे बीज सर्व पुरुषार्थ साधण्याची शक्ती धारण करते. येथे देवीच्या “ह्रीं” बीजाचा सांकेतिक निर्देश आहे.
‘वियद्’ म्हणजे आकाश (ज्याचा अक्षरी संकेत ‘ह’ आहे), ‘वीतिहोत्र’ म्हणजे अग्नी (ज्याचा संकेत ‘र’ आहे), आणि ‘ईकार’ म्हणजे ‘ई’ ची मात्रा. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात आणि त्यावर ‘अर्धेन्दु’ म्हणजे अनुस्वार (अर्धचंद्र व बिंदू – ‘ं’) सुशोभित होतो, तेव्हा देवीचे “ह्रीं” हे मूळ बीजमंत्र रूप तयार होते. हा बीजमंत्र माणसाच्या जीवनातील सर्व प्रकारच्या इच्छा आणि उद्दिष्टे (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) पूर्ण करणारा म्हणजेच सर्वार्थसाधक आहे.
शुद्ध अंतःकरणाचे, संयमी आणि ज्ञानसागर असलेले साधक या एकाक्षरी बीजाला ब्रह्मस्वरूप मानून त्याचे ध्यान करतात. त्या ध्यानात मनाचे भेद विरतात आणि परमानंदाचा अनुभव प्रकट होतो.

१. वियत् – आकाश.
२. वीतिहोत्र – अग्नी.
३. अर्धेन्दुलसितम् – अर्धचंद्राने शोभणारे.
४. बीजम् – देवतेचे तत्त्व संक्षेपाने धारण करणारा मंत्रध्वनी, बीजमंत्र
५. सर्वार्थसाधनम् – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साधण्यास सहाय्य करणारे.
६. एकाक्षरं ब्रह्म – एका अक्षरात सूचित झालेले ब्रह्मतत्त्व.
७. यतयः – संयमी साधक, संन्यासी.
८. शुद्धचेतसः – निर्मळ अंतःकरणाचे.
९. ज्ञानाम्बुराशयः – ज्ञान + अम्बुराशयः – ज्ञानाचे अथांग सागर.

 

वाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् ।
सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुसंयुक्तष्टात्तृतीयकः ।
नारायणेन संमिश्रो वायुश्चाधरयुक् तत: ।
विच्चे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः ॥ २० ॥

वाणी, माया आणि सृजनशक्ती यांच्या संकेतांतून ‘ऐं, ह्रीं, क्लीं’ ही बीजे प्रकट होतात. पुढे मुख, सूर्य, कान, बिंदू, वर्णमालेतील तिसरा वर्ण, नारायण, वायू आणि अधर या संकेतांच्या साहाय्याने ‘चामुण्डायै’ हे पद तयार होते. अखेरीस ‘विच्चे’ या पदाने नवार्ण मंत्र पूर्ण होतो. अशा प्रकारे सिद्ध झालेला हा देवीचा गूढ मंत्र साधकाच्या अंतःकरणात महान आनंद आणि दैवी चैतन्य जागृत करणारा मानला आहे.
या श्लोकात एका गुप्त कोड्याद्वारे नऊ अक्षरांचा महामंत्र कसा बनतो ते सांगितले आहे.
‘वाङ्माय’ म्हणजे सरस्वती बीज (ऐं), ‘ब्रह्मसू’ (माया बीज) म्हणजेच (ह्रीं), कामबीज म्हणजेच (क्लीं), त्यानंतरच्या अक्षरांच्या जोडणीतून (चा-मु-ण्डा-यै) हे शब्द तयार होतात, शेवटी (विच्चे) जोडले जाते. या सर्वांच्या मिलाफातून “ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे” हा नऊ अक्षरांचा (नवार्ण) मंत्र तयार होतो. हा मंत्र भक्ताला परम आनंद आणि शक्ती देणारा आहे.

१. ब्रह्मसूस्तस्मात् – ब्रह्म (ब्रह्मतत्त्व) + सूः (जन्म देणारी) + तस्मात् (त्यापासून) – ब्रह्मदेवाला जन्म देणाऱ्या आदिशक्तीपासून किंवा त्या पूर्वोक्त संकेतापासून – या मंत्रात वाङ्माया आणि ब्रह्मसूः हे शब्द अनुक्रमे देवीच्या बीजाक्षरांचा संकेत देतात. भाष्यपरंपरेत त्यांच्याद्वारे ऐं, ह्रीं आणि क्लीं ही प्रारंभीची बीजे सूचित झाल्याचे मानले जाते.
२. वक्त्रसमन्वितम् – वक्त्र (मुख, तोंड) + समन्वितम् (युक्त असलेले, जोडलेले) – मुख किंवा उच्चारणस्थानाशी संबंधित ‘आ’काराने युक्त. येथे ‘च्’ या वर्णाला ‘आ’ मात्रा जोडून ‘चा’ हे अक्षर सूचित केले आहे.
३. सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुसंयुक्तष्टात्तृतीयकः – सूर्यः + अवामश्रोत्र (अवाम – डावे नसलेले, म्हणजे उजवे; श्रोत्र – कान) + बिन्दु (बिंदू, अनुस्वार) + संयुक्तः + टात् (टकारापासून किंवा ट-वर्गापासून) + तृतीयकः (तिसरा वर्ण) – सूर्यसंकेताचा ‘म’कार, उजव्या कानाच्या संकेताचा ‘उ’कार आणि बिंदुरूप अनुस्वार यांच्या संयोगातून ‘मुं’ हे अक्षर तयार होते. त्यानंतर ट-वर्गातील तिसरा वर्ण ‘ड’ घेतला जातो.
४. वायुश्चाधरयुक्ततः – वायुः (वायू, हवा, प्राणशक्ती) + च (आणि) + अधर (खालचा भाग, खालचा ओठ) + युक् (जोडलेला) + ततः (त्यानंतर) – वायुसंकेताचा ‘य’कार अधराने सूचित केलेल्या ‘ऐ’ मात्रेशी जोडल्यावर ‘यै’ हे अक्षर तयार होते.
५. स्यान्महदानन्ददायकः – स्यात् + महत् + आनन्ददायकः – तो महान आनंद देणारा होतो

 

हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातःसूर्यसमप्रभाम् ।
पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम् ।
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे ॥ २१ ॥
नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनीम् ।
महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ॥ २२ ॥

हृदयकमळाच्या मध्यभागी विराजमान असलेल्या आणि उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या देवीचे मी भजन करतो. देवीने आपल्या हातांमध्ये पाश आणि अंकुश धारण केले आहेत; परंतु भक्तांसाठी तिचे रूप अत्यंत शांत सौम्य व प्रसन्न आहे. देवीचे हात भक्तांना इच्छित वरदान आणि अभय (रक्षणाचे वचन) देणारे आहेत. तीन नेत्र असलेली, लाल वस्त्रे परिधान केलेली आणि भक्तांच्या कल्याणकारी इच्छा पूर्ण करणारी ती देवी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी साक्षात कामधेनू आहे.
अशा या महादेवीला मी साष्टांग नमस्कार करतो. ही देवी माणसाच्या मनातील आणि जीवनातील सर्वात मोठ्या भीतीचा (महाभय) नाश करणारी आहे. ती वाट्याला येणाऱ्या महाभयंकर संकटांचे (महादुर्ग) निवारण करून मनात शांती निर्माण करते आणि ती साक्षात अथांग दयेची आणि करुणेची मूर्ती (महाकारुण्यरूपिणी) आहे.

१. हृत्पुण्डरीकमध्यस्थाम् – हृत् + पुण्डरीक + मध्यस्थाम् – हृदयकमळाच्या मध्यभागी विराजमान असलेली.
२. प्रातःसूर्यसमप्रभाम् – प्रातः + सूर्य + सम + प्रभाम् – सकाळच्या उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेली
३. वरदाभयहस्तकाम् – वरद + अभय + हस्तकाम् – एका हाताने वरदान आणि दुसऱ्या हाताने अभय देणारी
४. भक्तकामदुघाम् – भक्त + काम + दुघाम् – भक्तांसाठी कामधेनूप्रमाणे इच्छित फल देणारी

 

यस्याः स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया ।
यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता ।
यस्या लक्ष्यं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या ।
यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा ।
एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका ।
एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नैका ।
अतएवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ॥ २३ ॥

जिचे खरे स्वरूप ब्रह्मदेव आणि इतर देवतांनाही पूर्णपणे जाणता येत नाही, तिला ‘अज्ञेया’ म्हणजे पूर्णपणे जाणता न येणारी असे म्हणतात. जिचा अंत किंवा सीमा शोधूनही सापडत नाही, तिला ‘अनंता’ म्हणतात. जिचे स्वरूप कोणत्याही एका चिन्हाने, लक्षणाने किंवा व्याख्येने निश्चित करता येत नाही, तिला ‘अलक्ष्या’ म्हणतात. जिचा जन्म कधी आणि कसा झाला, हे सांगता येत नाही, कारण ती जन्मरहित आहे; म्हणून तिला ‘अजा’ म्हणतात.
तीच एक आदिशक्ती सर्वत्र व्यापून असल्यामुळे तिला ‘एका’ म्हणतात. परंतु तीच एक शक्ती संपूर्ण विश्वातील असंख्य रूपांत प्रकट होत असल्यामुळे तिला ‘नैका’, म्हणजे अनेक रूपे धारण करणारी, असेही म्हणतात. म्हणून देवी अज्ञेया, अनंता, अलक्ष्या, अजा, एका आणि नैका अशा नावांनी ओळखली जाते.
देवीचे परम स्वरूप देवतांनाही पूर्णपणे जाणता येत नाही. तिचा आरंभ, अंत किंवा सीमा नाही. ती कोणत्याही एका रूपात, नावात अथवा लक्षणात बांधता येत नाही आणि तिचा जन्मही झालेला नाही. ती एकच आदिशक्ती सर्वत्र व्यापून आहे; परंतु संपूर्ण विश्वातील असंख्य जीव, वस्तू, देवता आणि शक्ती यांच्या रूपाने तीच प्रकट होते. म्हणून देवी एक असूनही अनेक, साकार असूनही निराकार आणि सर्व रूपांत असूनही सर्व रूपांच्या पलीकडे आहे.

 

मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी ।
ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी ।
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ २४ ॥
तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम् ।
नमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् ॥ २५ ॥

ही देवी सर्व पवित्र मंत्रांची ‘मातृका’ (मूळ अक्षरे किंवा उगमस्थान) आहे. आपण जे शब्द बोलतो, त्या सर्व शब्दांमधील ‘ज्ञान’ तीच आहे. ती सर्व प्रकारच्या ज्ञानाच्याही पलीकडे (चिन्मयातीता) असणारे परम चैतन्य (चिन्मय रूप) आहे आणि जेव्हा सर्व सृष्टी नष्ट होते (पूर्ण शून्य काळ असतो), तेव्हा त्या शून्याची ‘साक्षीदार’ म्हणून केवळ तीच उरते. जिच्यापेक्षा श्रेष्ठ, मोठे किंवा पलीकडे या विश्वात दुसरे काहीच नाही, तिलाच ‘दुर्गा’ असे म्हटले जाते.ती दुर्गा देवी अत्यंत दुर्गम (केवळ बुद्धीने किंवा सहजतेने न सापडणारी) आहे. ती वाईट प्रवृत्तींचा आणि दुराचाराचा नाश करणारी (दुराचारविघातिनी) आहे. या संसारातील दुःख, संकटे आणि जन्म-मरणाच्या भीतीने घाबरलेला मी (भवभीतोऽहं), या संसाररूपी समुद्रातून पार करून नेणाऱ्या (संसारार्णवतारिणी) त्या भगवती दुर्गा देवीला मनापासून नमस्कार करतो आणि तिला शरण जातो.
देवी ही सर्व मंत्र, अक्षरे, शब्द आणि ज्ञान यांची मूलशक्ती आहे. सर्व ज्ञान तिच्यापासून प्रकट होते; तरीही तिचे परम स्वरूप शब्द, विचार आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. ती शून्याचीही साक्षी असून तिच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही तत्त्व नाही. जिचे स्वरूप जाणणे कठीण आहे, जी दुष्ट आचरण व वाईट प्रवृत्तींचा नाश करते आणि जीवाला जन्म-मृत्यूच्या संसाररूपी अथांग सागरातून पार नेते, त्या दुर्गादेवीला भक्तिभावाने नमस्कार असो.

 

इदमथर्वशीर्षं योऽधीते स पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति ।
इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति शतलक्षं प्रजप्त्वापि सोऽर्चासिद्धिं न विन्दति ।
शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधिः स्मृतः ।
दशवारं पठेद् यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते । महादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः ॥ २६ ॥

जो मनुष्य या देवी अथर्वशीर्षाचे ज्ञान किंवा महत्त्व न जाणून घेता (किंवा याचा पाठ न करता) देवीच्या मूर्तीची किंवा यंत्राची स्थापना करतो, त्याने इतर मंत्रांचा एक कोटी (शतलक्ष) वेळा जप केला, तरीही त्याला त्या मूर्तीची किंवा पूजेची सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणजेच, देवी उपासनेत या स्तोत्राला सर्वोच्च स्थान आहे.
या स्तोत्राची पुरश्चर्या (मंत्र सिद्ध करण्याची विधी) १०८ (शतमष्टोत्तरं) वेळा पाठ करणे अशी शास्त्रात सांगितली आहे. (१०८ वेळा पाठ केल्याने हे स्तोत्र भक्तासाठी सिद्ध होते).
जो मनुष्य दररोज याचे १० (दशवारं) वेळा पठण करतो, तो तात्काळ सर्व प्रकारच्या पापांमधून मुक्त होतो. इतकेच नव्हे, तर महादेवीच्या कृपेने (प्रसादतः) तो आयुष्यातील महाभयंकर संकटांना आणि कठीण प्रसंगांना (महादुर्गाणि) सहज पार करतो.
देवी अथर्वशीर्षाचे केवळ यांत्रिक पठण न करता त्याचा अर्थ, महत्त्व आणि देवीचे तत्त्व समजून श्रद्धेने अध्ययन केले पाहिजे. अर्थ न समजता आणि अंतःकरणात भक्तिभाव नसताना केवळ जपाची संख्या वाढविल्याने उपासनेची पूर्ण सिद्धी मिळत नाही. नियमित, नियमपूर्वक आणि एकाग्रतेने केलेले पठण मन शुद्ध करते, चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर नेते आणि महादेवीवरील श्रद्धा दृढ करते. देवीच्या कृपेने भक्ताला मोठ्यात मोठ्या संकटांवर मात करण्याचे धैर्य, विवेक आणि सामर्थ्य प्राप्त होते.

 

॥ फलश्रुती ॥
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।
सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति ।
निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति ।
नूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवतासान्निध्यं भवति ।
प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति ।
भौमाश्विन्यां महादेवीसन्निधौ जप्त्वा महामृत्युं तरति ।
स महामृत्युं तरति य एवं वेद ।
इत्युपनिषत् ॥

संध्याकाळी (सूर्यास्तानंतर) या स्तोत्राचे पठण केल्यास, माणसाकडून दिवसभरात झालेले सर्व पाप नष्ट होते. सकाळी (सूर्योदयाच्या वेळी) याचे पठण केल्यास, रात्रीच्या वेळी नकळत झालेले सर्व पाप नष्ट होते. जो माणूस सकाळी आणि संध्याकाळी (दोन्ही वेळा) नियमितपणे या स्तोत्राचा पाठ करतो, तो पूर्णपणे पापरहित (अपापो) होतो. मध्यरात्री (निशीथ काळात) किंवा ‘तुरीय संध्या’ (रात्रीच्या अंतिम प्रहरात) या स्तोत्राचा जप केल्यास भक्ताला ‘वाक् सिद्धि’ प्राप्त होते (म्हणजेच तो जे बोलतो ते सत्य ठरते). देवीच्या नवीन मूर्तीसमोर (किंवा प्रतिमेसमोर) या स्तोत्राचा जप केल्यास, त्या मूर्तीमध्ये साक्षात देवतेचे सान्निध्य (चैतन्य) निर्माण होते. नवीन मूर्ती किंवा यंत्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी या स्तोत्राचा पाठ केल्यास, त्या मूर्तीमध्ये दिव्य प्राणांची (ऊर्जेची) स्थापना योग्य प्रकारे होते. ‘भौमाश्विनी’ योगावर (म्हणजेच अश्विन महिन्यात जेव्हा मंगळवार येतो किंवा अश्विन नक्षत्रात जेव्हा मंगळवारचा योग येतो) महादेवीच्या मूर्तीसमोर किंवा शक्तिपीठात जाऊन या स्तोत्राचा जप केल्यास, मनुष्य ‘महामृत्यू’ (अकाली मृत्यू किंवा गंभीर संकट) सहज पार करतो. जो कोणी या स्तोत्राचे हे गुप्त रहस्य आणि महात्म्य जाणून घेतो, तो नक्कीच महामृत्यूच्या भयापासून मुक्त होतो. असे हे अथर्ववेदाचे पवित्र उपनिषद (देवी उपनिषद) येथे पूर्ण होत आहे.

🙏🌹🙏

लेखन – श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

Scroll to Top

Discover more from श्री ज्ञानोपासना

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Enable Notifications OK No Thanks